समतोल फाऊंडेशनच्या मनपरिवर्तन शिबीराचा समारोप समारंभ. एकेक नाव पुकारले जाऊ लागले. मुलाचे…त्याला न्यायला आलेल्या त्याच्या आईचे.
… मुलाची नजर भिरभिरते…त्याची आई त्याच्या दिशेने येतेय. लहान भाऊ तिच्या हाताचं बोट धरून येतोय
…किती वर्ष झाली आईला पाहिल्यावर? ६ महिने? एक वर्ष, दोन वर्ष…तीन? चार? आठवत नाही…किती दिवस झाले आईला सोडून आल्याला? का आलो? कोणासोबत? कशाच्या आकर्षणाने….कोणाच्या रागाने?
पण आता आईला पाहिल्यावर सर्व एक झाल्यासारखं वाटतं आहे… आईला बिलगल्यावर, आईचा हात पाठीवरून फिरल्यावर सारं काही वितळून गेलं. घर सोडल्यानंतरचा सारा कालावधी एका क्षणात विरून गेला…मुंबईत आल्यानंतरचं अशाश्वत जीवन…भेटलेले मित्र…त्यांच्या नाही नाही त्या सवयी…कधी स्वतःला जडल्या कळलंच नाही. दिवसभर काहीही करून पैसे मिळवायचे…कधी दीडशे, दोनशे…जास्तही…ते लगेच खर्चही करायचे. जपून ठेवले तर कोणी चोरेल याची भीती…जवळचे असे कोणी नाही…विश्वास ठेवण्याजोगे कोणी नाही…कायम दुस-याबद्दल असंशय…अविश्वास…जीवनाचं नागडं सत्य अनुभवायला भाग पाडणारा प्रत्येक क्षण! आईची आठवण येतेय, पण परत जाणार कसं? आई मला जवळ घेईल? बाबा मारणार तर नाहीत ना? लहानगे भाऊबहीण ओळखतील? आता काहीतरी बनूनच जाऊ…पैसे कमवून जाऊ…!
‘तो’ क्षण कधीच येणार नसतो. आयुष्याच्या उमलायच्या वयात चुकलेली वाट…ढासळलेला तोल….! याआधी घरातून पळून आलेल्या अनेकांच्या आयुष्यात तो कधीच आला नाही. पण आज समतोल फाउंडेशनने ‘तो’ क्षण वास्तवात आणला.

समतोल फौंडेशन च्या कामाबद्दल आणखी सविस्तर लिहिलेस तर नक्कीच आवडेल . लेख छान आहे .
By: sumedha on फेब्रुवारी 10, 2011
at 3:48 pm