Posted by: Milind Mohan Arolkar | जानेवारी 27, 2011

निळ्या ज्योतीचे नंदनवन- ३ (अंतिम)

बंधारा बांधला की…

बंधारा बांधला की…कालपर्यंत वाहात असलेल्या लहानश्या ओढ्याचे रूपांतर जेव्हा जलाशयात होते, तेव्हा त्याचा दृश्य परिणाम फार मोठा असतो. तो पाहाणा-याच्या मनावर अधिक होतो. त्या भागात जे लोक राहातात त्यांच्या मनोबलावर सकारात्मक परिणाम झालेला असतो. असाच परिणाम ज्या ज्या वाड्यांमध्ये डॉक्टरांनी बंधारे बांधले, तिथल्या ग्रामस्थांवर झाला. बंधा-यांच्या पाण्याच्या आधारावार काहींनी चक्कं कलिंगडं लावली. पीक भरपूर आलं. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर या कलिंगडांचे स्टॉल लागले. ऑक्टोबरच्या उन्हात ही कलिंगडं प्रवाश्यांना खुणाऊ लागली. गाड्यांच्या चाकांनी आपोआप स्टॉलवर गर्दी केली. उत्पनाचा नवा महामार्ग या निमिताने शेतक-यांनी अनुभवला. बंधा-याचं महत्व सर्वांना पटलं. पारंपारिक जलव्यवस्थापनाची आधुनिक मांडणी करताना डॉक्टर देवधरांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. एका वाडीत बांधलेला बंधारा पुढच्या वाडीतील लोक येऊन गुपचूप फोडून जात. आपल्याला पाणी मिळणार नाही या भीती सोबत नाठाळपणाचाही भाग त्यात असे. त्यावर उपाय म्हणून बंधारा बांधायला सुरूवात होण्या पूर्वी स्थानिक देवाला म्हणजे रामेश्वर, सातेरी, रवळनाथ, भवाईदेवी, वेतोबा अशा ग्रामदेवतांना ज्येष्ठ नागरिकांनी नारळ वाढवून गा-हाणी घालण्याची पध्दत सुरू झाली. त्यात बंधा-याची काळजी घे यासोबतच कोणी बंधारा फोडला तर त्याला शिक्षा कर असेही कलम घातले गेले. देवाच्या कोपाच्या भीतीने नाठाळपणाला पायबंद बसला आणि हे देवाचे काम म्हणून सर्वांचा सहभागही  वाढला.

या काळातच डॉक्टर प्रसाद आणि हर्षदा देवधर यांच्या व्यक्तिगत प्रयत्नातून सुरू झालेल्या कामाचं रूपांतर भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेत झालं. अनेक कार्यकर्ते स्वतःहून या कामात जोडले गेले.

उपाय निघाला बायोगॅसचा

बंधा-यांची चळवळ जोरात असतानाच ज्या कारणासाठी जंगलतोड होत होती, त्या घरगुती इंधनाकडे डॉक्टर देवधरांनी मोर्चा वळवला.

त्यावर उपाय निघाला बायोगॅसचा. अनुदान मिळतं म्हणून गावात काहींनी बायोगॅस बांधलेही होते. परंतु ते नादुरूस्त तरी होते किंवा शौचालयाला जोडलेले नव्हते. शौचासाठी बाहेर जाण्याचं प्रमाण गावात जास्त असतंच. बायोगॅस बांधून ते जर शौचालयाला जोडले, तर अधिक प्रमाणात घरगुती इंधन सहज उपलब्ध होतेच पण जी स्लरी बाहेर पडते ती बागायतीसाठी उत्तम खत म्हणून वापरली जाऊ शकते याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘भगीरथ’ च्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली. संस्थेच्या ‘बायोगॅस डॉक्टर’ कार्यकर्त्यांनी जुने व नादुरूस्त झालेले बायोगॅस कार्यान्वित केले. आजमितीला १० गावांमध्ये फेरो सिमेंट मॉडेलचे ३५० बायोगॅस- निळ्या ज्योतीची नंदनवने- कार्यान्वित झाले आहेत. गावातील गवंडी बायोगॅस बांधण्याच्या तंत्रज्ञानात प्रवीण झाले आहेत. ते आता बायोगॅस बांधणी तंत्रज्ञानाचे अभ्यास शिबिरे घेतात. आता चूलीमुळे घरात पसरणारा धूर विरून गेला आहे, जाताना गृहलक्ष्मीच्या डोळ्यांतील पाणी घेऊन गेलाय. ती आता अधिक स्पष्टपणे आपल्या संसाराकडे पाहू शकते आहे.

गेल्या काही वर्षांच्या अथक प्रयत्नांतून आता समाजालाही डॉक्टर देवधरांच्या कार्याचे महत्व पटते आहे. नाहीतर काही वर्षांपूर्वी हाफपॅंट घालून सायकल चालवीत डॉ. प्रसाद दवाखान्यात जात. उद्देश हाच की जातायेता समाजातील सर्व घटकांशी संवाद व्हावा. काहींनी समज करून घेतला की बहुधा डॉक्टरांना दवाखान्यातून फारसे उत्पन्न होत नसावे. कबीर एका दोह्यात म्हणतो-

सांई इतना दीजिये, जामे कुटुंब समाय,
मै भी भूखा ना रहूँ, साधू न भूखा जाय….

आजपर्यंत समाजासाठी कार्य करणार-या आधुनिक काळातील अनेक ‘साधूं’ चं देवधरांचं घर हे हकाचं ठिकाण आहे. डॉ. प्रसाद अणि हर्षदा यांनी खूप आधीच हे ठरवले आणि स्वीकारले की जोपर्यंत आर्थिक स्थिरता येईपर्यंत दोघांनी दवाखाना चालवायचा आणि एकदा ती आली अशी स्थिती उत्पन्न झाली की केवळ हर्षदा वहीनींनी दवाखाना चालवायचा. ज्या भागात दवाखाना आहे तेथील किमान वैद्यकीय शुल्कापेक्षा कमी शुल्क देवधरांच्या दवाखान्यात आकारले जाते. किंबहुना रूग्णाची आर्थिक स्थिती कमकुवत असेल, तर ते नाकारलेही जाते. एखादे हॉस्पिटल बांधून कायम सोन्याची अंडी देणारी कोंबडी निर्माण करावी असा विचार या दांपत्याने कधी केला असेल असे म्हणायला जागा नाही.

इलाही जमादारांचा एक शेर आहे-

आत्म्याचा सौदा करूनी जर स्वतःस विकले असते,
एकेक वीट सोन्याची, घर असे बांधले असते…

या ओळींचा खरा अर्थ देवधरांच्या सहवासात मला प्रथम कळला. कोणत्याही स्टेटस सिंबॉलचा स्पर्श स्वतःला न होऊ देता आपल्या मानसी आणि अवधूत या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी गावातील सर्वसामान्य मुले ज्या शाळेत जातात त्याच स्थानिक शाळेत पाठवले.

भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्राम विकासातील एकही मुद्दा डॉक्टरांनी सोडलेला नाही. गावांतील समस्या कोणतातरी एक प्रश्न सोडवून संपत नाहीत. कारण त्यांचे मूळ कारण दुस-याच समस्येत लपलेले असते. समस्यांची एकमेकात असलेली गुंफण ज्याला लक्षात आली, त्याला ग्रामविकासाची नाडी कळली असे म्हणता येईल. प्रसाद व हर्षदा या कसलेल्या डॉक्टरद्वयाला ती न कळली तर नवलच. शेती, शेतीला पूरक उद्योग, शिक्षण, अपारंपारिक उर्जास्रोत, महिला व बालकल्याण, आरोग्य या विषयांना घेऊन आज भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप पंचक्रोशीत कार्य करीत आहे. ग्रामविकासाचे हे प्रयत्न पाहायला येणा-यांना काही शुल्क आकारले जाते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की शुल्काचे नाव काढल्यावर हवशे, नवशे यांची संख्य़ा कमी होते, वेळ वाचतो. ज्यांना खरेच काम पाहाण्यात रस आहे, त्यांना ते असे काही कळते की त्यांची पावले परत परत आकेरीच्या दिशेने वळतात.

डॉ. देवधरांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक सन्मान मिळत असतात. या पुरस्कार देणा-यांच्या बाबतीत चोखंदळ राहाणारे देवधरांसारखे क्वचितच सापडतील. भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान च्या कार्याला देणगी देणा-यांची काही अट असेल आणि ती काम करण्यामागच्या मूळ सूत्राच्या आड येत असेल तर विनम्रतेने ती नाकारण्याचे ‘धाडस’ डॉ. प्रसाद यांनी दाखविलेले आहे. सामाजिक काम करताना स्वाभाविक पणे येणारा स्वतःचा अहंकार डॉ. प्रसाद यांनी सहजतेने दूर ठेवला आहे. किंबहुना, सामाजिक काम ज्यावेळी व्यक्तिगत पातळीवर होते त्यावेळी अपमान आणि उपेक्षेचे कटू अनुभव त्यांनी एक अपरिहार्यता म्हणून स्वीकारलेले आहेत. त्यामुळेच सामाजिक कार्याला ‘आहे म्हणून’ देणगी देणा-याचा अहंकार त्यांना सलतो.  आज भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानची घडी व्यवस्थित बसवून सामाजिक काम प्रथमावस्थेत असणा-या संस्था व समाजासाठी धडपडणा-या कार्यकर्त्यांचे पालकत्व डॉ. प्रसाद यांनी स्वीकारले आहे.

डॉ. देवधर गेले दशकभर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करीत आहेत, त्यांनी गावात केलेले ग्रामविकासाचे, जलसंवर्धनाचे प्रयोग, त्यामागची भूमिका, आलेले अनुभव हे सर्व फार जवळून पाहाण्याची व ते काम अनुभवण्याची संधी मला लाभली. आयुष्यभर डॉक्टरकी करून, सोन्याची वीटेचे घर बांधण्याची सर्व शक्यता असताना, आकेरी सारख्या लहान गावात राहून डॉ. प्रसाद आणि हर्षदा देवधर यांनी समाज आपले घर मानले. भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान च्या रूपाने या भावनेचे व्यक्त स्वरूप असे पथदर्शक काम उभे राहीले आहे. अशी निळ्या ज्योतीच्या नंदनवने अनेक ठिकाणी उभी राहू शकतात, गरज आहे एका गवंड्याची…डॉ. प्रसाद देवधरांसारख्या!

संपर्कासाठी: डॉ. प्रसाद देवधर –
Mo: 9422596500,
Email: bhagirathgram@gmail.com
Website: www.bhagirathgram.org/

 

Posted by: Milind Mohan Arolkar | जानेवारी 24, 2011

निळ्या ज्योतींचे नंदनवन -2

….१९९३ ला किल्लारी गावात भूकंप झाला. समाजातील अनेकांनी भूकंप पीडितांना जशी जमेल तशी मदत केली. अनेक सामाजिक संस्था संघटना मदतकार्यासाठी पुढे आल्या. जनकल्याण समिती या संस्थेने डॉक्टर समुदायाला मदत कार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं. प्रसाद आणि हर्षदा देवधर हे डॉक्टर दांपत्य या आवाहनाला प्रतिसाद देत किल्लारीला पोहोचलं. काही महीने त्या ठिकाणी भूकंपपीडितांची सेवा केल्यानंतर आपल्या आकेरी गावात परतत असतानाच आपण जिथे आहोत, तिथल्या प्रश्नांना उत्तरं शोधायची हा संकल्प निश्चित झाला.

झाराप गावात तिठ्यावर आपल्या दवाखान्यात रूग्णांशी संवाद साधताना डॉ. प्रसाद व हर्षदा देवधर यांना रोग्यासोबत गावातील प्रश्नांचीही नाडी कळत होती. समाजाच्या प्रश्नांबद्दल त्यांच्या मध्ये सातत्याने चर्चाही होत होती. झाराप पंचक्रोशीत पाण्याचे दुर्भिक्ष्य असे. चांगला पाऊस पडूनही फेब्रुवारीच्या नंतर पाणी तळाला जाई. कोकणात पाऊस भरपूर पडला तरीही समुद्र जवळ असल्याने वेगाने समुद्रास मिळते. हे पाणी जमिनीत मुरायला वनसंपदा मदत करते. झाडांची मुळे जमीनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढवतात आणि पाण्यालाही रोखतात. मग तसे का होत नाही? उत्तर शोधताना लक्षात आले की काही वर्षांत झाडेही कमी झाली आहेत. जवळपासची अरण्ये ओस पडत आहेत. अचानक वणवे लागत आहेत. हळू हळू अनेक गोष्टींची उकल व्हायला लागली. खेड्यातील घरांमध्ये चुलींवर जेवण रांधण्याची पध्दत. त्यासाठी जळणाचा साठा करावा लागतो. ही लाकडे येणार कुठून? दरवर्षी कुठून मिळणार सुकी लाकडे? मग लावा वणवे…पेटवा झाडे. झाड तोडायला बंदी आहे, पण सुकलेलं झाड तोडायला नाही. अशा पध्दतीने कळत नकळत मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे जमिनीची पाणी धारण क्षमता कमी झाली. विहीरी लवकर तळ गाठू लागल्या. शेतीला पाणी पुरेनासं झालं. भरपूर पाऊस मिळूनही.

झाराप गावात गोपीनाथाचे मंदीर आहे. त्या मंदीराच्या आवारात एक तळी. गोपीनाथाची तळी म्हणून ती ओळखली जायची. नावालाच तळी म्हणायची. अनेक वर्षे गाळ साचून ती बुजली होती. डॉ. देवधरांनी मे महीन्यामध्ये विद्यार्थी परिषदेच्या श्रमानुभव शिबीरात कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही तळी उपसण्याचा उपक्रम आयोजित केला. १५ २० कार्यकर्त्यांनी तीन चार दिवस भरपूर परिश्रम घेऊन त्यातील गाळ काढला. पाणी प्रवाहित झाले. लक्षात आले की ही तळी त्या पंचक्रोशीच्या पूर्वापार चालत आलेल्या जलव्यवस्थापनातील एक महत्वाचा दुवा आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. डॉ. देवधरांना लक्षात आले की जल व्यवस्थापनाचा फार शास्त्रीय विचार आणि उपाय पूर्वजांनी करून ठेवलेत. फक्त त्याचा विचार आजच्या पिढीने कधीच केलेला नाही. हा विचार मनात येताच त्या वर्षीच्या सप्टेंबर महीन्याच्या आसपास बंधा-राची जागा निश्चित करून कार्यकर्त्यांना आणि काही समजूतदार गावक-यांना सोबत घेऊन बंधारा बांधला. स्वतः हाफपॅंट घालून डॉक्टर चिखलात उतरले. बांधायला जितक्यांचे हात राबत होते, त्याच्या दुप्पट जण सभोवताली उभे राहून मजा पाहात होते. त्यांतील बहुतेकांच्या मनात हे काय आता नवीन काढलंय…प्रयोग फसणार बहुधा… असेच विचार होते. ते विचार व्यक्त करून बांधणा-यांना नाऊमेद करण्याचा उत्साह ओसंडून जात होता. बंधारा बांधून झाला. वाहून जाणारं पाणी हळू हळू स्थिराऊ लागलं, स्थिरावतं झालं…एका बाजूने मुशी बांधून त्याला वाहायची मुभा देऊनही. लोक म्हणाले

‘डॉक्टर …पाणी व्हाऊन चलला, टिकतला कसा?’

…डॉक्टरांनी आपलं जलसूत्र सांगितलं..

‘पाण्याला पूर्ण बंदिस्त करू नका, त्याला वाहायची मुभा द्या, पुढच्या वाडीलाही ते मिळायला हवं. नाहीतर पाण्याचा जोर वाढून ते बंधा-याला फोडून पुढे जाईल आणि नाहीच गेलं तर पुढच्या गावातील गावकरी येऊन बंधारा फोडतील’.

Posted by: Milind Mohan Arolkar | जानेवारी 19, 2011

निळ्या ज्योतींचे नंदनवन -1

वर्ष २००४ ची गोष्ट. सप्टेंबर महिना असावा. सकाळी सकाळीच डॉ. प्रसाद देवधरांनी बाईक काढली. म्हणाले, चला, एक छोटा बंधारा बांधून येऊया. खताची रिकामी पोती, कुदळ आणि फावडं घेऊन स्वप्नील सावंतला मागे बसवलं आणि सायकलवर मी. आम्ही निघालो. त्यांच्या घरापासून दीड दोन किलोमीटर अंतरावर हायवेवर आम्ही थांबलो. रस्त्याच्या एका बाजूला भाताची शेतं, दुस-या बाजूला मोकळी जमीन, मध्ये हायवे. भातशेतीतून येणारं पाणी दुसरीकडे जायला मोरी केलेली. मोरी म्हणजे, रस्त्याच्या खालून मोठे पाईप टाकून पाणी वाहून जाण्यासाठी केलेली व्यवस्था. भाताची शेतं ज्या बाजूला होती तिथे पाण्याचा लहानसा संचय नैसर्गिकपणे निर्माण झालेला होता. निर्मळ पाणी. पाहिल्याबरोबर प्यायची इच्छा व्हावी असं. पातो-यावर चतुर (चतुर …म्हणजे रामलिंगम नाही, लहान उडणारे कीटक) इकडे तिकडे भिरभिरत होते. सूर्यप्रकाशात त्यांचे चमचमणारे पंख. सूर्याच्या कोवळ्या किरणांमुळे आजूबाजूच्या झुडुपांच्या पानांच्या हिरव्या रंगाला झळाळी प्राप्त झालेली. डॉ. देवधरांनी कामाला सुरूवात केली. आधी त्या जलसंचयाच्या व्यासावरची माती कुदळीने खणून काढली. ती आम्हाला सोबत आणलेल्या पोत्यांमध्ये भरायला सांगितली. अशी आठ नऊ पोती भरल्यावर आम्ही ती मोरीच्या तोंडाशी आणली. डॉक्टरांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती अशी रचली की त्यातून पाण्याचा निचरा खूप कमी होईल. पाणी थांबवलं नव्हतं, त्याच्या प्रवाहाचा वेग कमी केला होता. त्यामुळे पाणी जमीनीत मुरायला पुरेसा अवधी मिळणार होता. पाण्याचं जमिनीतील प्रमाण वाढणार होतं. वर्षातील अधिक काळ त्या भागात ते उपलब्ध होणार होतं. डॉक्टरांनी त्यांचं जलसूत्र सांगितलं -
“धावणा-या पाण्याला चालायला लावा, चालणा-या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला मुरायला लावा”.

आमचा बंधारा पूर्ण झाला. आपल्या पंचक्रोशीत पाण्याचं प्रमाण वाढावं म्हणून वैद्यकशास्त्रातील हा निष्णात डॉक्टर हातातील इंजेक्शनची सिरिंज आणि स्कालपेल सोडून कुदळ फावडं घेऊन मातीत उतरला होता.

समदा दिवाळी अंक २०१० साठी हा लेख लिहीला होता. अचानक लक्षात आलं की हे ब्लॉगवर का असू नये?…सामाजिक कामाच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित(…अपूर्ण)

« Newer Posts - जरा जुन्या पोस्ट्स »

प्रवर्ग

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 66 other followers