आतून गहीवरलेले पर्रिकर म्हणाले, “दोळ्यांत दुका कित्यांक !”

पर्रिकर रूढ परिभाषेतील “नेता” कधीच नव्हते, लोकांनीच त्यांना नेता मानले होते. मनोहर पर्रिकर हे सर्वांचे “भाई” होते. गोव्यात, कोकणात “भाई” हे केवळ आदरार्थी संबोधन नाही. ते एक आश्वासक नाते आहे. पर्रिकर यांना शासकीय अधिकारी सोडले तर कोणी कधीच …साहेब .. सर.. म्हटल्याचे स्मरत नाही.

संघाची गोवा विभागाची समन्वय बैठक व्हायची, त्यात जर पर्रिकर उपस्थित असले तर त्यासारखी गंमत नाही. समाजाच्या तळागाळात जाऊन काम करणारे संघ सृष्टीतील संस्थांचे कार्यकर्ते विविध विषयांवर चर्चा करीत, समस्या मांडत आणि अनेकदा भाजपचे सरकार असल्याने त्याच बैठकीत उपस्थित असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्याना अप्रत्यक्षपणे जाब विचारण्यातही कोणी मागेपुढे पाहात नसे.

समोरून येणारे वाक्बाण हसत हसत झेलत मिश्किल हसत, त्या कार्यकर्त्याला अजून जोरकस टिपण्णी करण्यासाठी प्रोत्साहित करणारे मुख्यमंत्री नाही तर त्याच बैठकीतील एक कार्यकर्ता केवळ याच भूमिकेत तिथे रमलेले पर्रिकर आठवतात.


पर्रिकर अश्या बैठकांना फार कमी वेळा येऊ शकले. भाजपवर, सरकारवर टीका आपलेच अन्य क्षेत्रातील कार्यकर्ते करताहेत यात काही गैर आहे असे त्यांना कधीच वाटले नाही. याउलट, तो कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती किती उत्कटपणे आपल्या क्षेत्राचा विषय मदत आहे, याचे कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचे.

मग बैठकीत चहाचा ब्रेक झाला की त्या वेळात मग ती ‘आक्रमणकारी’ कार्यकर्ती “भाई” ना भेटून आपल्या बोलण्याचे समर्थन करायला लागताच, तिने सरकारवर टीका करायला अजून कोणते मुद्दे घ्यायला हवे होते ते समजावून सांगणारे मनोहरभाई अनेकांनी अनुभवले असतील. 

“दोळ्यांत दुका कित्यांक !”

एकदा एका विद्यार्थी हिताच्या मुद्दयाबद्दल चर्चा करण्यासाठी आम्ही विद्यार्थी परिषदेचे काही कार्यकर्ते मुख्यमंत्री दालनात मुख्यमंत्री पर्रिकरांसोबत नेहमीच जशी चालायची तशी खडाजंगी स्वरूपाची चर्चा करीत होतो. अचानक त्यांनी कोणाला तरी आत बोलवायला सांगितले.

साधारण पासष्टीच्या वयाचे एक गृहस्थ आणि एक विशीतील युवती दालनात आले. बाप-लेक कोणता तरी प्रश्न मांडत होते… त्यांच्या कोकणीवरुन लक्षात आले की बहुधा गोव्याच्या दक्षिण टोकाला असणार्‍या काणकोण तालुक्यातील ते असावेत. बाबांनी आयुष्यात केलेले कष्ट त्यांच्या चेहर्‍यावरून.. अंगकाठीवरून दिसत होते. त्यांची लेक मात्र अत्यंत उद्विग्नपणे अनेक गोष्टी मुख्यमंत्र्यांना ऐकवत होती. शासकीय खात्याकडून अन्याय घडावा असे काही त्यांच्या बाबतीत घडले असावे. पर्रिकर त्या युवतीचे शांतपणे ‘ऐकून घेत’ मध्ये मध्ये जमेल तशी सफाई तिला देत होते. बोलता बोलता अचानक संताप अनावर होऊन त्या युवतीच्या डोळ्यात पाणी तरारले…. आणि मुख्यमंत्री पर्रिकर स्तब्ध झाले. काही क्षण शांततेत गेले.

आतून गहीवरलेले पर्रिकर तिला म्हणाले, “दोळ्यांत दुका कित्यांक !” (डोळ्यात अश्रु का आले!) … बस्स इतकेच !

त्या बापलेकीचा प्रश्न नक्की सुटला असेलच. पण एका मुख्यमंत्र्याची आपल्या लोकांच्या बाबतीतली ती संवेदना नि:शब्दपणे आम्हाला स्पर्शून गेली. जाहीर सभांमध्ये लोकहिताच्या वल्गना करणारे राजकारणी पाहण्याची सवय असलेल्या समाजाला त्यांच्यात नाळ गुंतलेला एक असा मुख्यमंत्री अनुभवायला मिळत होता.

पर्रिकरांचा पिंड हा राजकारण्याचा कधीच नव्हता. ते स्वतःलाही कधी राजकारणी.. नेता.. वगैरे मानीत नसत. त्यामुळे त्यांना ना वेष बदलायला लागला ना भाषा. ‘संघाने सांगितले म्हणून मी इथे आहे. उद्या संघाने सांगितले अन्य क्षेत्रात काम कर, तर तिथे जाणार!’ आपल्या राजकीय अस्तित्वाचे इतके साधे सोपे तत्वज्ञान घेऊन अभिनिवेशरहीत जीवन पर्रिकर जगले.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s