आतून गहीवरलेले पर्रिकर म्हणाले, “दोळ्यांत दुका कित्यांक !”

पर्रिकर रूढ परिभाषेतील “नेता” कधीच नव्हते, लोकांनीच त्यांना नेता मानले होते. मनोहर पर्रिकर हे सर्वांचे “भाई” होते. गोव्यात, कोकणात “भाई” हे केवळ आदरार्थी संबोधन नाही. ते एक आश्वासक नाते आहे. पर्रिकर यांना शासकीय अधिकारी सोडले तर कोणी कधीच …साहेब .. सर.. म्हटल्याचे स्मरत नाही.

संघाची गोवा विभागाची समन्वय बैठक व्हायची, त्यात जर पर्रिकर उपस्थित असले तर त्यासारखी गंमत नाही. समाजाच्या तळागाळात जाऊन काम करणारे संघ सृष्टीतील संस्थांचे कार्यकर्ते विविध विषयांवर चर्चा करीत, समस्या मांडत आणि अनेकदा भाजपचे सरकार असल्याने त्याच बैठकीत उपस्थित असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्याना अप्रत्यक्षपणे जाब विचारण्यातही कोणी मागेपुढे पाहात नसे.

समोरून येणारे वाक्बाण हसत हसत झेलत मिश्किल हसत, त्या कार्यकर्त्याला अजून जोरकस टिपण्णी करण्यासाठी प्रोत्साहित करणारे मुख्यमंत्री नाही तर त्याच बैठकीतील एक कार्यकर्ता केवळ याच भूमिकेत तिथे रमलेले पर्रिकर आठवतात.


पर्रिकर अश्या बैठकांना फार कमी वेळा येऊ शकले. भाजपवर, सरकारवर टीका आपलेच अन्य क्षेत्रातील कार्यकर्ते करताहेत यात काही गैर आहे असे त्यांना कधीच वाटले नाही. याउलट, तो कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती किती उत्कटपणे आपल्या क्षेत्राचा विषय मदत आहे, याचे कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचे.

मग बैठकीत चहाचा ब्रेक झाला की त्या वेळात मग ती ‘आक्रमणकारी’ कार्यकर्ती “भाई” ना भेटून आपल्या बोलण्याचे समर्थन करायला लागताच, तिने सरकारवर टीका करायला अजून कोणते मुद्दे घ्यायला हवे होते ते समजावून सांगणारे मनोहरभाई अनेकांनी अनुभवले असतील. 

“दोळ्यांत दुका कित्यांक !”

एकदा एका विद्यार्थी हिताच्या मुद्दयाबद्दल चर्चा करण्यासाठी आम्ही विद्यार्थी परिषदेचे काही कार्यकर्ते मुख्यमंत्री दालनात मुख्यमंत्री पर्रिकरांसोबत नेहमीच जशी चालायची तशी खडाजंगी स्वरूपाची चर्चा करीत होतो. अचानक त्यांनी कोणाला तरी आत बोलवायला सांगितले.

साधारण पासष्टीच्या वयाचे एक गृहस्थ आणि एक विशीतील युवती दालनात आले. बाप-लेक कोणता तरी प्रश्न मांडत होते… त्यांच्या कोकणीवरुन लक्षात आले की बहुधा गोव्याच्या दक्षिण टोकाला असणार्‍या काणकोण तालुक्यातील ते असावेत. बाबांनी आयुष्यात केलेले कष्ट त्यांच्या चेहर्‍यावरून.. अंगकाठीवरून दिसत होते. त्यांची लेक मात्र अत्यंत उद्विग्नपणे अनेक गोष्टी मुख्यमंत्र्यांना ऐकवत होती. शासकीय खात्याकडून अन्याय घडावा असे काही त्यांच्या बाबतीत घडले असावे. पर्रिकर त्या युवतीचे शांतपणे ‘ऐकून घेत’ मध्ये मध्ये जमेल तशी सफाई तिला देत होते. बोलता बोलता अचानक संताप अनावर होऊन त्या युवतीच्या डोळ्यात पाणी तरारले…. आणि मुख्यमंत्री पर्रिकर स्तब्ध झाले. काही क्षण शांततेत गेले.

आतून गहीवरलेले पर्रिकर तिला म्हणाले, “दोळ्यांत दुका कित्यांक !” (डोळ्यात अश्रु का आले!) … बस्स इतकेच !

त्या बापलेकीचा प्रश्न नक्की सुटला असेलच. पण एका मुख्यमंत्र्याची आपल्या लोकांच्या बाबतीतली ती संवेदना नि:शब्दपणे आम्हाला स्पर्शून गेली. जाहीर सभांमध्ये लोकहिताच्या वल्गना करणारे राजकारणी पाहण्याची सवय असलेल्या समाजाला त्यांच्यात नाळ गुंतलेला एक असा मुख्यमंत्री अनुभवायला मिळत होता.

पर्रिकरांचा पिंड हा राजकारण्याचा कधीच नव्हता. ते स्वतःलाही कधी राजकारणी.. नेता.. वगैरे मानीत नसत. त्यामुळे त्यांना ना वेष बदलायला लागला ना भाषा. ‘संघाने सांगितले म्हणून मी इथे आहे. उद्या संघाने सांगितले अन्य क्षेत्रात काम कर, तर तिथे जाणार!’ आपल्या राजकीय अस्तित्वाचे इतके साधे सोपे तत्वज्ञान घेऊन अभिनिवेशरहीत जीवन पर्रिकर जगले.

Advertisements

मनोहर पर्रिकर : आठवणीचा कोलाज – भाग 1

मनोहर पर्रिकर : काही क्षणचित्रे-1

स्थान : जुने विधान भवन पणजी (मांडवी नदी काठचे)
वेळ: दुपारी 12.30
औचित्य : अभाविप आंदोलन संदर्भात भेट

गोव्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्टायपेंड संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एक उग्र आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी अभावीप कार्यकर्त्यांना स्वतंत्र चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले ती माझी व मनोहर पर्रिकर यांची पहिली भेट. 2001-2002 च्या काळातील ही घटना.

आंदोलनाची उग्रता वागवत, विद्यार्थी हितासाठी हितसंबंधांचा विचार व करता सरकार विरोधी भूमिका सहजपणे मिरवणारे त्याकाळातील आम्ही सर्व कार्यकर्ते आणि त्यांचा संघटनमंत्री या नात्याने त्याच अतिनिर्भीड पणे मी विषयाची मांडणी केली. सरकारने विद्यार्थिहिताची भूमिका घेण्यात कशी कुचराई केली आहे हे मांडताना त्या काळातील परिषद कार्यकर्त्यामध्ये असणारा अति आक्रमकपणा माझ्या बोलण्यात आला असावा.

पर्रिकर थोडे मनात रागावले ही असतील. त्यांनी दालनात उपस्थित असलेल्या भाजपाच्या एका प्रमुख कार्यकर्त्याला विचारले – हो कोण? – ABVP चो नवो प्रचारक! त्यांना उत्तर मिळाले. मी विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे हे कळल्यावर पर्रिकरांमधील पालक कार्यकर्ता जागा झाला बहुधा ! चर्चा सुरू असतानाच माझी विचारपूस केली… मुळचा कुठला… गोव्यात कधी आलास.. आधी का भेटला नाहीस… घरी जेवायला कधी येतोस…राहायची व्यवस्था कुठे .. इ.. आत्मियतेने चौकशी झाल्यावर मग परत आमची मूळ विषयावर चर्चा सुरू झाली.

…..अगदी आक्रमक पणे आम्ही सर्वजण आमचे विषय मांडत होतो. खरे म्हणजे पर्रिकरांना त्याची सवय नसावी. भाजप जाऊदे… विरोधी पक्षाच्या एकाही नेत्याची टाप …..नव्हती पर्रिकरांसोबत आगाऊ वाद घालण्याची. आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने आणि स्मरणशक्तीच्या जोरावर ते कोणत्याही फाईलमधील दाखले सहजपणे देऊन विरोधकाचे तोंड बंद करू शकत होते.

पण त्यांच्या दालनात होते ते कोणतेही राजकीय स्वप्न न पडलेले आम्ही कार्यकर्ते आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे बुद्धिवान विद्यार्थी! सर्वांनी पर्रिकरांना प्रश्नांच्या सरबत्तीने अगदी बेजार करून सोडले असावे. ज्यांचे प्रश्न होते त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कशा होऊ शकतात याचा एक अभ्यासपूर्ण आराखडाच आम्ही मांडला होता, ती फाइल आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली. लक्षात आले की चर्चेच्या सुरुवातीला आमच्या आगाऊ प्रश्नाच्या सरबत्तीने थोडेसे डिवचले गेलेले पर्रिकर आमच्या मुद्द्यांमध्ये रस घेऊ लागले. आमच्यामध्ये वास्को येथे राहणारी एक विद्यार्थिनी अत्यंत उत्तमा रीतीने मुद्दे मांडत होती. तिच्या त्या आवेशाने प्रभावित होऊन पर्रिकरांनी तिचे नाव आणि कुठे राहते ते विचारले. आणि भाजप कार्यकर्त्याला म्हणाले- आपल्याला वास्को मध्ये ही चांगली कार्यकर्ती मिळाली!

आम्ही ज्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री पर्रिकरांना भेटलो होतो, तो प्रश्न अखेर सुटला. पर्रिकरांनी अत्यंत खुल्या मनाने कौतुक केले ते आमच्या (आगाऊ) आक्रमकपणाचे, आमच्या अभ्यासपूर्ण मांडणीचे… आमच्या भीडभाड न ठेवता ठामपणे विद्यार्थिहिताचे विषय मांडण्याचे !

आता ही घटना आठवताना असे लक्षात येते की त्यांच्या जागी एखादा खुज्या व्यक्तिमत्वाचा अहंकारी राजकारणी असता तर .. प्रश्न सुटणे दूर .. एक कायमचे वितुष्ट सरकार व विद्यार्थी संघटनेत निर्माण झाले असते. पर्रिकर उमदे होते, गुणग्राहक होते…समाज नक्की कसा आहे .. त्याचे प्रश्न काय आणि त्याला उत्तरे कोणती याची स्वाभाविक जाण त्यांना होती.

आज लक्षात राहातात ते ठामपणे आपले प्रश्न मांडणार्‍या कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे नेते पाहाणारे पर्रिकर !…